भावविश्व

एखादा विचार मनात यावा आणि दुसऱ्याक्षणी तो निघून जावा, तसच आपण एका क्षणी स्वप्नात प्रवेश करतो आणि दुसऱ्याक्षणी त्यातून बाहेर येतो. स्वप्नात घडणाऱ्या घटनांना सुरूवात नसते. जेव्हा आपण स्वप्नात प्रवेश करतो तेव्हा एखादा प्रसंग चालु असतो आणि आपण काही क्षण तिथे घालवतो. जणू काही आपली उपस्थिती तिथे क्रमप्राप्त असते. पुढे काय घडणार याची उत्सुकता निर्माण होते न होते तोवर आपण स्वप्नातून बाहेर येतो. 

एकंदरित स्वप्नातील हा घटनांचा खेळ निरंतर चालु असतो. जेव्हा आपल्या उपस्थितीची त्यात आवश्यकता असते, तेव्हा आपण स्वप्नात आपसूकच हजर होतो. पण स्वप्नातील आपली उपस्थिती ही आपल्या ताब्यात नसते आणि त्यातील घडणाऱ्या गोष्टींवरही आपला ताबा नसतो. तिथे आपण केवळ आणि केवळ एक प्रेक्षक असतो. स्वप्ने आणि स्वप्नातील गोष्टींची एक वेगळी इच्छाशक्ती असते. ती शक्ती तिच्या मायेने आपल्याला घडणाऱ्या गोष्टींची साक्षी बनवत असते. 

जागृत जगात आपला बराचसा ताबा असतो. बऱ्याच गोष्टी आपण ठरवून करतो तर काही गोष्टी नकळत घडतात. पण त्या गोष्टींचा प्रतिसाद आपल्याला हवा तसा मिळेलच याची शाश्वती देता येत नाही आणि काही गोष्टी आपल्या ताब्यात ही नसतात. कधीकधी वेळेवर येणारी ट्रेन उशिरा येते आणि आपल्याला उशीर झाला असेल तर ती मिळूनही जाते. 

आध्यात्मिक दृष्टीने पाहायचे झाल्यास सर्व गोष्टी ह्या परमशक्तीच्या इच्छेने होत असतात. स्वप्नातील जग असो किंवा जागृत जग, दोन्ही ठिकाणी घडणाऱ्या घटना परमशक्तीच्या मायेने घटित होत असतात. फरक हाच असतो की स्वप्नात आपले नियंत्रण नसते, तर जागृत विश्वात आपण विचारपूर्वक वावरू शकतो, जरी आपले घडणाऱ्या गोष्टींवर पूर्णपणे नियंत्रण नसले तरी. स्वप्नात ती परमशक्ती काही घटना घडवित असते, त्यातील पात्रेही तिनेच निर्माण केलेली असतात, आपणही तिथे तिच्या इच्छेने वावरतो आणि नियत्रंण ही तिचे असते. त्यात घडणाऱ्या घटना सत्य म्हणून आपण पाहत असतो. जेव्हा आपण स्वप्नातून बाहेर पडून जागृत होतो तेव्हा त्या घटना काल्पनिक वाटतात. 

जागृत जगात आपण जे पाहतो, ऐकतो, अनुभवतो ते स्वतः मध्ये प्रतिबिंबित करुन घेतो म्हणजेच त्याचे आकलन करतो आणि प्रतिसाद ही देतो. आपल्या भावभावना जोडतो. त्यामुळे आपण ह्या सगळ्या गोष्टींशी एक भावनिक विश्व निर्माण करतो. स्वप्नातही हे विश्व तिथे प्रतिबिंबित होत असते. त्यामुळे स्वप्नात घडणाऱ्या घटना आपल्या ताब्यात नसल्या तरी त्यांचा आपल्या भावनांशी संबंध हा असतो. त्यामुळे प्रत्येकाला पडणारी स्वप्ने ही त्यांच्या भावविश्वाशी निगडित असतात. 
जागृत जगात जरी सर्व परमशक्तीच्या इच्छेने सर्व होत असेल तरी तिथे आपले भावविश्व आपल्या जीवनात प्रतिबिंबित होते आणि आपल्या जीवनाला एक आकार देते. घडणाऱ्या घटनांवर आपले पूर्णपणे नियंत्रण नसले तरी आपला प्रतिसाद आपल्या भावविश्वावर प्रभाव उमटवते. 

गोष्टी ह्या निरंतर घडतच असतात. परमशक्ती हे घडवत असते व आपण त्या गोष्टींचा एक भाग म्हणून वावरत असतो आणि आपल्या विचाराने भावविश्वाचा अनुभव घेतो. 

Comments

Popular posts from this blog

स्वप्ने आणि परमात्मा

स्वप्ने आणि वास्तविकता

स्वप्नावस्थेतील गोष्ट