स्वप्ने आणि वास्तविकता


आपण स्वप्नांकडे कसे पाहतो ह्यावर ती कारण किंवा अकारण आहेत हे आपल्याला समजते. वास्तविकपणे पाहता स्वप्न ही काही क्षणांची असतात. त्यामूळे त्यांचें महत्त्व ही आपल्याला एवढे वाटत नाही. मग स्वप्ने खरंच इतकी विचारात न घेण्यासारखी आहेत?

हे जग, ही वास्तविकता जी आपण आता अनुभवतो आहे ती एका काळात घटत असणारी गोष्ट आहे. एकदा गेलेला काळ पुन्हा येत नाही. त्यामूळे प्रत्येक क्षण अद्वितीय असतो. वेळ हा एक धागा आहे आणि वस्त्र म्हणजे क्षण. तो क्षण घडवून आणण्यासाठी काळ कितीतरी गोष्टी विणत असेल. 

स्वप्ने ही देखील क्षण आहेत. ती आपण पाहतो, ती त्यावेळी अनुभवतो, त्यात आपण काहीं काळ राहतो, म्हणजे ती देखील ह्या विशाल काळाचा भाग आहेत. आता हा आपला वैयक्तिक भाग झाला की आपण किती क्षणांना महत्त्व देतो आणि किती क्षणांना नाही महत्त्व देत. पण त्यामूळे त्या क्षणांचे उद्देश असफल होत नाही. कारण ते क्षण काहीं कारणांसाठी घडत असतात. 

आपण पक्षी नाही पण स्वप्नांत आपण स्वतःला हवेत उंच तरंगताना पाहता. आपण एखाद्या व्यक्तीला स्वप्नांत सहज भेटतो जिची भेट आपल्याला जागृत जगात कठिण वाटते. 

स्वप्ने आपल्याला अश्या काही गोष्टी दाखवतात आणि संभ्रमात टाकतात की आपल्याला जागल्यावर सावरायला थोडा वेळ लागतो. निरखून पाहिले तर आपण एका विचारांच्या वादळातून मनाच्या एका स्थिर कोपऱ्यात आसरा घेण्याचा तेंव्हा प्रयत्न करतो. स्थिती जागृत आणि स्वप्नावस्थेत वेगवेगळी असते. आपण भौतिक जगात आहोत आणि आपले शारीरिक अस्तित्व ईथे आहे. त्यामूळे आपल्याला नक्कीच जागृत जगाला अधिक महत्त्व दिले पाहिजे. 

स्वप्नांचं जाळं अत्यंत गुंतगुंतीचं आहे पण नक्कीच ती ह्या काळचक्राचा एक भाग आहेत. नाहीतर त्यांचे अस्तित्व नसते. मनाचे देखील एक अफाट विश्व आहे हे आपल्याला स्वप्नांमुळे कळते. मनाच्या साहाय्याने तर आपण असाध्य साध्य करतो. त्यामूळे मनाचे विश्व कसे निरर्थक असेल? 

जागृत जग आणि स्वप्नातील जग ह्या विभिन्न बाजू आहेत. आपले मन दोन्हीं ठिकाणी भ्रमण करते. तसे पाहिले तर जेव्हां मन काहिवेळासाठी अस्तित्वहीन होते तेव्हा आपण गाढ निद्रेत असतो. त्यामूळे मनाला अस्तिव तर जागृत आणि स्वप्नातील जगात प्राप्त होते आणि 'मी' आहे असे आपल्याला जाणवते. 

मन त्याच्या वैयक्तिक जाणिवेवर अवलंबून असतें. त्यामूळे आपण जीवन हे मनाचे विश्व आहे असे मानले तरी वावगं ठरणार नाही. त्यामूळे नियम देखील त्याचेच असतील. त्याच्यासाठी काय स्वप्न आणि काय तो ते ठरवत असतो. 

भूत, भविष्य आणि वर्तमान जणू मनासाठी स्थानके आहेत. त्यातून भ्रमण करणारी आगगाडी स्वप्न आणि जागृत जगाच्या शहरातून मनाला त्याच्या 'मी' बद्दल ओळख करून देत असावी. 

Comments

Popular posts from this blog

स्वप्ने आणि परमात्मा

स्वप्नावस्थेतील गोष्ट