स्वप्ने आणि परमात्मा


महापुरुषांनी ह्या जगास स्वप्नवत दर्शविले आहे. परंतु ते खरेच स्वप्नवत आहे का? स्वप्नात आपण एक साक्ष म्हणून वावरतो. स्वप्नातील घटनांचा व त्यातील आपल्या अस्तित्वाचा विचार केला असता त्या केवळ स्वप्नापुरता मर्यादित असतात. बरे स्वप्न ह्या त्या स्थितीपुरता मर्यादित मानले तर त्या स्थितीत मर्यादित काळापुरता घडणाऱ्या घटना तितक्याच वास्तविक असतात. 


स्वप्नाचा उद्गम ही आपल्यातूनच होतो, त्याचे संचालनही आपले मन करते आणि त्याचा लय आपण जागृत झाल्यावर होतो. ती स्वप्नस्थिती आपल्यात निर्माण होते म्हणून स्वप्नातील सृष्टी, त्यातील माणसे व इतर प्राणी, त्यातील निर्जीव वस्तू ह्या सर्व आपणच असतो. तसेच ह्या जागृत जगताचे आहे. जो ह्या जागृत जगताचा सृष्टीकर्ता आहे, तोच चराचरात व्यापून राहिला आहे. तोच अखंड परमात्मा सत्य असेल तर हे जग ही तेवढेच सत्य आहे. म्हणून आपण खरे आहोत व स्वप्नातील त्या स्थिती ह्या खऱ्या आहेत. 


आता ह्या सृष्टीत ठायीठायी परमात्मा असेल तर आपणही त्याचेच स्वरूप आहोत असे समजणे म्हणजे आपण त्या परमात्म्याशी एकरुप होणे होय. इथे प्रत्येक वस्तू आपलेच स्वरूप आहे हेही ह्याद्वारे आपल्या चिंतनास येते. भले मग महापुरुषांनी ह्या अवाढव्य विश्वाच्या पसाऱ्यास स्वप्न का बरे म्हटले असेल? त्याचे उत्तरही आपल्याला स्वप्नस्थिती सांगते. जेव्हा आपण स्वप्नस्थितीत असतो तेव्हा त्यातील क्षणांमध्ये आपण त्यातील एक घटक बनून वावरतो. 


स्वप्नातील घटना आपल्याला खऱ्या वाटतात. काम, क्रोध, लोभ, भय, मोह, मत्सर इत्यादी भावना आपण त्या स्थितीत अनुभवतो. जणू काय आपण आपल्यातच विणलेल्या स्वप्नाच्या जाळ्यात गुरफटलो जातो. आता जे हे जाळे आहे तीच माया आहे. ह्या मायेमुळे आपण हे विसरतो की आपण स्वप्नात आहोत. मग एकाक्षणी आपल्याला जागरूकता येते व आपण स्वप्नस्थिती सोडून जागृत जगात येतो. तसे बघाल तर हे जग देखील परमात्म्याने त्याच्यातून विणलेले मायेचे जाळे आहे. 


अर्थात परमात्मा ह्या मायेच्या जाळ्यात स्वतः अडकला आहे का? तर ह्याचे विश्लेषण आपण द्वैत स्वरूपात करू शकतो. परमात्मा हे मूळ स्वरूप आहे, ते जाणणे ही वास्तविक जागरूकता आहे. जो ह्या मायेच्या जाळ्यात अडकला आहे तो त्याचे मूळ स्वरूप विसरून वावरत आहे. जेव्हा त्याच्या ठायी जागरूकता येईल तेव्हा तो ही त्याच्या मूळ स्वरूपाशी स्वतःला एकरुप मानेल. 

Comments

Popular posts from this blog

स्वप्ने आणि वास्तविकता

स्वप्नावस्थेतील गोष्ट