स्वप्नावस्थेतील गोष्ट


बहुतेक गोष्टींना प्रारंभ आणि शेवट असतो. पण स्वप्नावस्थेतील गोष्टी वेगळ्या असतात. ह्या अवस्थेतील गोष्टींची ना सुरुवात माहित असते ना त्यांचा शेवट माहीत असतो. ह्या गोष्टी अधांतरी राहतात. जर गोष्टीची सुरुवात आणि शेवट ठाऊक नसेल तर गोष्ट समजणार तरी कशी? निव्वळ अंदाज बांधून जर ती गोष्ट रचली तरी गेली तरी त्या गोष्टीचा उद्देश त्याच्या प्रारंभाशी निगडित असेलच. आता हेच पाहा, ह्या विश्वाचा प्रारंभ कित्येक वैज्ञानिक व इतर बुद्धिजीवी शोधण्याचा प्रयत्न करीत आहेत. तसेच ह्या विश्वाच्या प्रारंभाचे वेगवेगळे अंदाज बांधून त्यावर सखोल विश्लेषण ही केले जात आहे. 

प्रत्येक क्रियेला कारण आहे. तसे स्वप्नांतील गोष्टींना काहीना काही कारण असेलच. दिवसभरात आपण निरनिराळे विचार करीत असतो. त्याचा आपल्या मनात संचय होतो. आपण जरी त्यांचे फार वेळ मंथन करीत बसलो नाही तरी ते विचार मनाच्या कोणत्यातरी कानोस्यात राहतातच आणि रात्री झोपल्यावर आपण मनातील साचलेल्या विचारांच्या अमर्यादित विश्वात प्रवेश करत असतो. तांदळातून खड्यांची जशी निवड करावी तशी स्वप्नेदेखील एखाद्या ठराविक विचाराची निवड करून आपल्याला त्यावर आधारित एखादी गोष्ट प्रक्षेपित करीत असतात. अर्थात त्यातील पात्रे देखील स्वप्नच ठरवित असते. कधीकधी स्वप्ने अशी येतात ज्यात असणारे विचारदेखील आपलेच आहेत का नाही असा प्रश्न पडतो. 

स्वप्नात असणारी गोष्ट अशी असते ज्यात आपण आगंतुक आहोत की काय असे वाटायला लागते. एखादे प्यादे  जसे बुद्धिबळात एखाद्या चौरसात उचलून ठेवावे तसे स्वप्न आपल्याला त्याच्या गोष्टीतील कोणत्यातरी प्रसंगात आणून ठेवते. तसेच ते प्यादे बुद्धिबळाच्या पटावरून बाहेर कधी जाणार हे त्या प्याद्याला ठाऊक नसते तसे स्वप्न आपल्याला त्या गोष्टीतून बाहेर कधी काढेल हे आपल्याला ठाऊक नसते.

स्वप्नांतील गोष्टींमागे विचार असतात हे जरी मान्य केलं तरी त्यांचा स्रोत हा त्या गोष्टीच्या प्रारंभाशी निगडित असावा असे वाटते तसे जर असेल तर मी त्या स्रोताला मुख्य पात्र म्हणायला मुळीच संकोच करणार नाही. त्या स्रोतांचा उद्देश व त्या स्वप्नाचा अर्थ यांचा काहीना काही संबंध असावा असे वाटते. जर आपल्याला ते कळले तर ती गोष्ट समजायला आपल्याला मदत होईल. 

आता गोष्टीच्या शेवटचा विचार केला तर ते आपल्या मानण्यावर आहे. जेव्हा आपण एखाद्या गोष्टीवर विचार करणे थांबवतो तेव्हा त्या गोष्टीचा मार्गक्रम तिथेच थांबतो. पण पुन्हा त्या गोष्टीवर विचार करायला सुरुवात केली तर ती पुढे मार्गस्थ होते. 

जर मन तृप्त झाले तर ते आनंदी राहते. स्वप्नातील गोष्ट जरी अधांतरी राहत असली तरी मन आनंदी असेल तर स्वप्न नसलेली गाढ निद्रा येते व मुख्य पात्र असलेला स्रोत व आपण यांत फारसा फरक जाणवत नाही. बहुतेक आपण आनंदी राहावे हा त्याचा उद्देश असावा. 

Comments

Post a Comment

Popular posts from this blog

स्वप्ने आणि परमात्मा

स्वप्ने आणि वास्तविकता